पहूर येथील पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीसांचा निषेध

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी ) । पहूर येथील ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांचा मोबाईल प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांनी हिसकावून त्यांना भर बसस्थानकावर अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी शहर पत्रकार संघटनेच्या वतीने पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कारवाईचे वृत्तांकन व छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांचा मोबाईल फोन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी हिसकावून घेऊन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.  सदर घटना पत्रकारितेची गळचेपी करणारी असून या घटनेचा शहर पत्रकार संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शांताराम लाठे यांच्यासह शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे, उपाध्यक्ष डॉ संभाजी क्षीरसागर, सचिव जयंत जोशी, मनोज जोशी, शरद बेलपत्रे, गणेश पांढरे, रवींद्र घोलप, सादिक शेख, रविंद्र लाठे, गणेश साखळे, संतोष पांढरे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Protected Content