पहूर पेठ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज ! जे . व्ही . पाटील यांच्याकडे सूत्रे

पहूर ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ ,  सांगवी , खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल संपल्याने येथे प्रशासकराज येणार आहे.

 

जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जाणार्‍या पेठ ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल सोमवारी ( ता . २४ ) संपला. गत पंचवार्षिकमध्ये लोकनियुक्त महिला सरपंच होण्याचा बहुमान नीता रामेश्वर पाटील यांना मिळाला. उपसरपंच शामराव नामदेव सावळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी गावकर्‍यांच्या सहकार्याने विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना या कामांची पावती म्हणून विविध पुरस्कार प्राप्त झालेत.

 

‘माझी वसुंधरा ‘अभियानात ग्रामपंचायतीला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवणारा होणारा ठरला. जामनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू मानले जाते . त्यामुळे नेहमीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सत्तेची समीकरणे बांधली जातात.  १७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात खर्चाणे आणि सांगवी यांचा समावेश होतो. आता ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने येथे प्रशासकराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

धुरीणांचा सन्मानपूर्वक निरोप

 

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांचे पत्र प्राप्त झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून सरपंच ,  उपसरपंच आणि सदस्य म्हणून कार्य करणार्‍या सर्व धुरीणांचा यथोचित सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला .

 

आज पासून प्रशासक राज

 

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांच्या आदेशानुसार  जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामनेर शाखा अभियंता जे . व्ही . पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते ग्रामपंचायत मध्ये रुजू झाले .यावेळी त्यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सरपंच पती रामेश्वर पाटील , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , उपसरपंच श्यामराव सावळे , अरुण घोलप आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. आज ते प्रशासक पदाची सुत्रे आपल्या हाती घेणार आहेत.

Protected Content