मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची माहिती कायदा सुव्यस्थेचा आढावा बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासंदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर असून कायदा, सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सरकारची असली तरी कोणीही कायदा हातात घेत संघर्ष वा तेढ निर्माण करू नये, अशी कृती झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
भोंगे हा मुद्दा नवीन नाही.सरकारने लाऊडस्पीकर काढावा किंवा नाही याचा प्रश्न उद्भवत नाही. अंतिम निर्णयापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेण्यात येणार असून, त्यात राज ठाकरेंनाही बोलावले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल २००५ , तसेच राज्य सरकारचे २०१५ तसेच २०१७ मध्ये काही शासन निर्णय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालय निर्णयाधीन राहून राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार पोलिस प्रशासनाच्या परवानगीनेच लाऊडस्पीकर लावले जावेत, परवानगी नसलेल्यांनी लाऊडस्पीकर लावू नयेत. असेहि ना. वळसे-पाटील यांनी सांगितले.