मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे.
यापुर्वी मुंबईचे परमबीर सिंग यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परमबीर सिंह यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा चौथा गुन्हा आहे. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने ९ लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंह हे देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. राज्य सरकारने कारवाईच्या दृष्टीने पावले टाकल्यावर परमबीर सिंह यांनी मुंबई सोडून चंडीगडमध्ये आश्रय घेतला होता. वैद्यकीय कारणास्तव सिंह हे गेले चार महिने सुट्टीवर आहेत. या काळात त्यांनी चंडीगडमधील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाठविल्याचे सांगण्यात येते. अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक केली. त्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. यावरून देशमुख यांना अटक करण्याची केंद्रीय यंत्रणेची तयारी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. गेल्या दोन आठवड्यांत सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली आहे.