परप्रांतीयांसाठी भुसावळहून लखनऊसाठी श्रमीक एक्सप्रेस रवाना

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या घरी जाता यावे यासाठी आज सायंकाळी भुसावळहून लखनऊला विशेष श्रमीक एक्सप्रेस सोडण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मुळगावी पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला याबाबत सुचना दिल्यात. या प्रवाशांना आपल्या मुळगावी जाताना कुठलीही अडचण येवू नये याकरिता स्वतः जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी भुसावळ ला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
भुसावळसह जळगाव-५२०, धुळे-१८५, अकोला-८८ व बुलढाणा भागातील ५१३ प्रवाशांनी प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या लखनऊ परीसरातील १३०६ प्रवाशांना एस.टी.बसेसद्वारे आज दुपारीच भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत एका बोगीत साधारणतः ५४ प्रवाशांना बसवण्यात आले तर एकूण २४ डब्यांची भुसावळ-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळातून रवाना झाली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, डीआरएम विवेक कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्यासह महसूल, रेल्वेच्या विविध भागातील अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. श्रमिक एक्स्प्रेसने लखनऊसाठी रवाना झालेल्या सर्व १३०६ प्रवाशांना प्रशासनातर्फे तसेच भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यातर्फे जेवण, पिण्याचे पाणी व बिस्कीट पुरविण्यात आली तसेच पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content