मुंबई: वृत्तसंस्था । मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू चालत असल्याचं आम्ही ऐकतोय, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
महाडच्या तळीये आणि साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळून प्रचंड जीवितहानी झाली. चिपळूण, महाड, कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढा घातला आहे. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रावर संकटाची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी खोचक ट्विट करतानाच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केला आहे.
स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून या नागरिकांसाठी खूप उशिराने मदत मिळाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी पाठवण्यात आल्या नाहीत. अधिकारी नेटवर्कमध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राणे यांनी केली आहे.
आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.