पदवीधर , शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

नागपूर: वृत्तसंस्था । राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या १ रोजी डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांवरून रस्सीखेच चालली असताना निवडणूक आयोगाने आज या निवडणुकीची घोषणा केली.

नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होईल. कोरोना संसर्गामुळे सुमारे ५ महिने ही निवडणूक लांबली. नागपूर, पुणे व औरंगाबादचे अनुक्रमे अनिल सोले, चंद्रकांत पाटील व सतीश चव्हाण तर, अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी प्रतिनिधित्व केले.

ऐन दिवाळीच्या उत्सवात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. १२ नोव्हेंबर रोजी नामांकनासाठी अखेरचा दिवस तर, १३ तारखेला छाननी होऊन १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी विधान परिषदेवर लागणार आहे. काही महिन्यांपासून ही नियुक्ती वारंवार लांबणीवर पडत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन नावे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्यपाल निकषांवर बोट ठेवून ही नावे फेटाळण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार अत्यंत सावधपणे पावले टाकत आहे.

एकीकडे हा तीढा कायम असतानाच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याने राजकारण चांगलंच तापण्याची चिन्हे आहेत. राज्यावर कोरोना साथीचं संकट ओढवल्यानंतर सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता साथ काही प्रमाणात नियंत्रणात येत असतानाच राज्यातील ही पहिलीच निवडणूक असून या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक होत असलेल्या पदवीधरच्या तीन पैकी दोन जागा सध्या भाजपकडे असून भाजपपुढे या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या पाच जागा एकत्रितपणे लढणार का?, एकत्रित लढणार असतील तर जागांचे वाटप कसे होणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Protected Content