मुंबई : वृत्तसंस्था । ज्यांना लोकांनी नाकारले आहे त्या गोपीचंद पडलकरांना महत्व देण्याची गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
“गोपीचंद पडळकरांना विनाशकाली विपरीत बुद्धी सूचली आहे. ज्याचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात? उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि तुम्ही अगदी पत्रकारपरिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात. लोकांनीच त्यांना नाकारलं आहे, तुम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही.” अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांबद्दल प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे. आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये. म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचंही पडळकर म्हणाले आहेत.