आम्ही वचन पाळणारे…तोडणारे नव्हेत- मुख्यमंत्री

नागपूर प्रतिनिधी । आम्ही वचन पाळणारे आहोत, वचन तोडणारे नाही, असं टोला लगावताना आमची बांधिलकी ही जनतेशी असल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, काहीजणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून हिणवणार्‍यांनी हिंमत असेल तर आम्ही स्थगिती दिलेल्या कामांची यादी सादर करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या गंभीर तक्रारीची दखल घेण्यात आली असून माहिती घेऊनच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सांगतानाच शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाल कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. स्मारकातील काळंबेरं दूर करून देशाला अभिमान वाटेल असं स्मारक आम्ही उभारणार आहोत, असंही ते म्हणाले.

Protected Content