नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशव्यापी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपुष्टात येतोय. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर देशाची आणि राज्यांची काय धोरणं असावीत यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवारी) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी ३ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत निर्माण झालेल्या स्थितीला तोंड देण्याबरोबर लॉकडाउनच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लॉकडाउन वाढणार की आणखी दुसरा निर्णय घेतला जाणार हे स्पष्ट होणार आहे. देशात करोनाचे संकट घोंघावत असताना देशात अनेक ठिकाणी करोनाचा धोका वाढताना दिसतोय. तर काही ठिकाणी हा धोका नियंत्रणातही आलाय. तसंच गोवा, मिझोराम ही राज्य करोनामुक्त झालीत. देशव्यापी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपुष्टात येतोय. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या ६२,९३९ वर पोहचलीय. यातील २,१०९ जणांनी आपले प्राण गमावलेत तर १९,३५८ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. यातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत हे विशेष.. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २०,२२८ रुग्ण आढळले आहेत तर ७७९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.