चेन्नई : वृत्तसंस्था । काँग्रेस नेते राहुल गांधींकडून कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरुच आहे. राहुल गांधींनी तामिळनाडूमधील करुर येथील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत, असा आरोप केला.
रविवारी राहूल गांधी यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवे तीन कृषी कायदे भारतीय शेतीला उद्ध्वस्त करणारे आहेत. कृषी कायद्यांद्वारे भारतीय शेती दोन- तीन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न आहे,अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधानांकडून शेतकरी, कामगार आणि देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी देश चालवला जात नसून काही उद्योगपतींसाठी चालवला जातो, असा आरोप राहुल गांधींनी केला. तामिळनाडूच्या नागरिकांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवणे हे नसून चीनला देशाच्या सीमांवर रोखणे हे होते, अशा शब्दांमध्ये गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला अहंकारी आणि अयोग्य असल्याचं म्हटलंय.
केंद्र सरकारनं लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी पंजाब, हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये ११ चर्चेच्या फेऱ्या निष्फळ झाल्या आहेत.