तिरुवन्नामलाई वृत्तसंस्था । देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये घोटाळा घोटाळा झाला आहे. तामिळनाडूमध्ये तपास सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत तपासामध्ये कुड्डालोर, तिरुवन्नामलाई, विल्लुपुरम, सलेम, कल्लाकुरिची या जिल्ह्यांमध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र नसतानाही ४० हजार जणांना पैशांचे वाटप करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत वर्षातून तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे वाटप करण्यात येते. फसवणूक होत असल्याची माहिती अंदाजे वर्षभरापूर्वी पहिल्यांदा समोर आली होती. कुड्डालोर येथील जिल्हाधिकारी चंद्रशेखर सखामुराई यांनी पिलाईयारमेडू गावातील काही शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांचे नाव या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या यादीमध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिलं होतं. यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते
तपासामध्ये कृषि विभागाच्या सह निर्देशकांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये अशाप्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरण असल्याची कबुली दिली. चुकीची माहिती आणि खोटे पुरावे सादर करुन पात्र नसलेले लोकं लाभ घेत असल्याचा आरोप आहे. खोट्या लाभार्थींच्या खात्यावर १० कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत देण्यात आल्याचा कबुली एका अधिकाऱ्याने दिली. यापैकी दीड कोटी रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जण हे सलेम जिल्ह्यातील थारामंगलम येथील आहेत. या लोकांनी शेतकरी नसणाऱ्यांनाही कंप्युटर सेंटरच्या माध्यमातून किसान सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मदत केली. केवळ सालेम जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे १४ हजार बोगस लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार बोगस लाभार्थी असल्याचे समजते. ५१ इतर लोकांचीही ओळख पटवण्यात आली आहे.
यामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी के. राजासारख्या व्यक्तींचाही समावेश आहे. के. राजाला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबरच सलेम कृषी विभागाचे सह निर्देशक इलानगोवान यांची बदली करण्यात आली आहे.
या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिसामी यांनी तिरुवल्लूरमध्ये दिली. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच दहा हजारहून अधिक बोगस लाभार्थींना या योजनेचा फायदा मिळाल्याची माहिती समोर येणं धक्कादायक आहे, असं म्हटलं आहे.
====