मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदववरून मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे करण्यात येत असतांना आता संजय राऊत यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी खोटी असल्याचा विरोधकांचा कधीपासूनच आरोप आहे. यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये अनेकदा शाब्दीक वाद झालेले आहेत. अलीकडच्या काळात या संदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मोदी यांची पदवी देता येणार नसल्याचे सांगत अरविंद केजरीवाल यांना दंड केला आहे. यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे.
या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आह. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. यात नमूद केले आहे की, ’काही लोक माननीय पंतप्रधानांची पदवी खोटी असल्याचं म्हणत आहेत. पण पंतप्रधानांची पॉलिटिकल सायन्समधील पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, यावर माझा प्रामाणिक विश्वास आहे. त्यामुळे आता ती पदवी आमच्या नवीन संसद भवनाच्या भव्य प्रवेशद्वारावर प्रदर्शित केली जावी, जेणे करून लोक शंका उपस्थित करणार नाहीत’ या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक सल्ला दिल्याचे दिसून येत आहे.