न्हावीचे प्रगतिशील शेतकऱ्याला डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं तर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व विविध अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार ‘ देऊन दि.२७ डिसेंबर २०२२ मंगळवारी रोजी नाशिक येथे सपत्नीक गौरविण्यात येण्यात आहे.

खान्देशातून यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रगतिशील युवा शेतकरी सचिन देवराम इंगळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे..शेतकरी सचिन इंगळे आणि सुविद्य पत्नी व न्हावीच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या योगिता इंगळे यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

हा देखणा सोहळा नाशिक येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी ११ ते ३ या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात कृषी विचारवंत व शेतकरी नेते विजय जावंधिया हे असणार आहेत ,तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारतीताई पवार ,गोवा राज्याचे मा.जिल्हाधिकारी प्रताप काणकर ,कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर, दिल्ली ‘ इफको ‘ च्या संचालिका साधनाताई जाधव , व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे डॉ.पंढरीनाथ थोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त व सेंद्रिय शेती तज्ञ सदुभाऊ शेळके ,कृषिविश्व ऍग्रीटेकचे सुभाष शिंदे ,मुंबई आकाशवाणी चे कृषी प्रसारण अधिकारी डॉ.संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच समारंभात ” कृषी गौरव विशेषांक ” आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळाही संपन्न होईल. प्रसिद्ध गायिका रेखा महाजन ,सुखदा महाजन हे काही शेतकरी गीते सादर करणार असून सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर व कलावंत तुषार वाघुळदे हे करणार आहेत असे आयोजक डॉ.संजय जाधव यांनी कळविले आहे..

Protected Content