न्याय्य मागण्यांंसाठी महसूलचा बेमुदत संप (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती मागील दोन वर्षापासून होत नसल्याने तसेच महसूल सहायकाचे रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने राज्यभर आंदोलन करण्यात येत असून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल कर्मचारी यांचा संपात सहभाग आहेत. शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये शासनाने तत्वतः मान्य केलेल्या मागण्या सहा वर्षाचा कालावधी होऊनही राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी नाईइलाजस्तव २१ मार्चपासून टप्याटप्याने सुरुवात केली असून आज सोमवार ४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र परदेशी, भाऊसाहेब नेटके, खातिक तडवी, योगेश ननवरे, किशोर ठाकरे, डी.एम. अडकमोल, दिलीप पाटील, देवेंद्र चंदनकर, श्रीकांत माटे, योगेश पाटील, किरण लोहार, जे. एस. गुरव, अमोल जुमडे, जागृती पवार, सुनंदा पाटील, रेखा चंदनकर, सुमती मनोरे, नम्रता नेवे, परविन तडवी, अनिता पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या बेमुदत संपात जिल्ह्यातील वर्ग २ मधील ५६ कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर असून ३५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तर १९ कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित आहेत. वर्ग ३ मधील ९७२ कर्मचाऱ्यांपैकी ९ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर असून उर्वरित संपूर्ण ९६३ कर्मचारी हे संपात सहभागी झाले आहेत. वर्ग ४ मधील १४८ कर्मचाऱ्यांपैकी २ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर असून उर्वरित सर्व १४६ कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. यानुसार एकूण १२१३ कर्मचाऱ्यांपैकी १४ कर्मचारी हे पूर्वपरवानगीने रजेवर असून ११४४ कर्मचारी हे संपात सहभागी झालेले आहेत तर केवळ ५५ कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित आहेत. यावेळी श्रेणी १ चे अधिकारी सेवेत रुजू होते. महसूल विभागातील ११४४ जणांनी संपात सहभाग घेतल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला.

 

या आहेत प्रमुख मागण्या
नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्क्यावरून २० टक्के करण्याचे शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये मान्य करून देखील अद्यापही शासन निर्णय काढण्यात आलेला नसून तो तातडीने निर्गमित करावा.

नायब तहसीलदाराला राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड पे मात्र वर्ग ३ चे पदाचे देण्यात आलेला आहे. त्यामुळे नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३००/- वरून ४६०० करण्यात यावा.

राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून तातडीने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व भरतीबाबत शासनास कालमर्यादा ठरवून देण्यात यावी.

कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थश्रेणीमध्ये पदोन्नती कोटा ४० टक्के केला पण महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली गेलेली नसून ती त्वरीत देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/363918102313590

 

Protected Content