न्यायमूर्तींची बदली ही खेदजनक आणि लाजीरवाणी बाब- प्रियंका गांधी

नवी दिल्ली । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढणार्‍या न्यायाधिशांची तडकाफडकी केलेली बदली ही खेदजनक आणि लाजीरवाणी बाब असल्याचे नमूद करत काँग्रेसच्या महासरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची काल मध्यरात्री बदली करण्यात आली. यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या बदलीचा निषेध करणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात, ”सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही. पण ती खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. मात्र सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे.”

दरम्यान, दिल्लीत सुरु असणार्‍या हिंसाचाराबाबतच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणार्‍या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. अत्यंत तातडीने करण्यात आलेली ही बदली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

Protected Content