गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जि. एस. ए. स्कुलमध्ये देखील मराठी भाषा , तिचा इतिहास , प्रगल्भता आणि व्यापकता याचे महत्व सांगण्यात आले. मराठी भाषेचा विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे. भाषा आपल्यावर आईसारखे प्रेम करते , आपण देखील पुत्रवत प्रेम करून भाषेच्या उपकारांची परतफेड केली पाहिजे. १५०० ते २००० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेली मराठी ही खऱ्या अर्थाने शिवराय – फुले – शाहू – आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मायबोली आहे. महानुभाव पंथ , वारकरी संप्रदाय , छत्रपतींचे स्वराज्य , पुरोगामी महाराष्ट्र या सर्वांच्या जडणघडण मध्ये मायमराठीचे मौलिक योगदान आहे.

 

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी विषय शिक्षकाने आपली मांडणी प्रभावी करणं क्रमप्राप्त आहे. आ – आई पासून प्रारंभ होणारी मराठी आपल्याला ज्ञ – पर्यंत आणून ज्ञानी बनविण्याचे काम करते. आपल्या भाषेवर प्रेम आणि इतर भाषांचा आदर करणं हेच आपल्या मायमराठीचे संस्कार आहेत , असे प्रतिपादन शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित , शाळेतील सर्व शिक्षकवर्ग , विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content