जळगाव प्रतिनिधी । वडील भुसावळ येथे टी.सी. आहेत, मुलीस रेल्वेमध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगून तरूणाने वेळोवेळी असे एकूण सात लाख रूपये घेतल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने फसवणूक झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी पितापुत्रावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आकाश मनोहर पाटील व मनोहर पाटील दोघे रा. वडगाव ता. रावेर असे संशयित आरोपीचे नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, योगिता खैरनार (४०) या महिला न्यु सम्राट कॉलनी या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास असून त्या व्यावसायीक आहेत. त्यांचे नवीन बी.जे मार्केट या ठिकाणी साई कृपा इलेक्ट्रॉनिक्स नावाचे सेकंड हॅँड कलर टि.व्ही. विक्रीचे दुकान आहे. त्यांची मुलगी वर्षा हिने कला शाखेची पदवी पुर्ण केली आहे. ती सुशिक्षीत बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात होती. दरम्यान सन २०१८ च्या जून महिन्यात श्वेता हिचा मित्र आकाश पाटील हा नेहमी खैरनार यांच्याकडे येत जात होता. भुसावळ रेल्वे विभागात ओळख असून वडील हे भुसावळ येथे टी.सी. आहेत, त्यामुळे रेल्वेत नोकरी लावून देतो,असे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला. सुरूवातीला आकाश याने फॉर्मसाठी १० हजार रूपये भरावयाचे सांगीतले. त्यानुसार खैरनार यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली. त्यानंतर १५ दिवसांनी आकाश याने खैरनार यांच्याकडे येऊन ५० हजाराची मागणी केल्यानुसार रोकड दिली. वेळोवेळी पैश्यांची मागणी करत अशा पध्दतीने खैरनार कुटुंबाकडून आकाश व त्याचे वडील मनोहर पाटील अशा दोघांनी सुमारे सात लाख रूपये उकळले. त्यानंतर ही मुलीस नोकरी लागली नाही. पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी योगिता खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी हे करीत आहेत.