नोंदणीकृत शेतकर्‍यांसाठी भावांतर योजना लागू करा- आ. मंगेश चव्हाण यांची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कापूस खरेदीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्यामुळे यामुळे नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोना वैश्‍विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी अतिशय कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील नोंदणीकृत शेतकर्‍यांचा कापूस घरातच पडलेला आहे. व्यापारी ३००० ते ४००० रु च्या भावाने कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा २००० ते २५०० रु प्रति क्विंटल तोटा होत आहे. समोर येणार्‍या पावसाळ्यामुळे शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करणे शक्य होवू शकणार नाही. त्यामुळे नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या कापसाकरीता भावांतर योजना लागू करण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे,

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, या भावांतर योजनेमध्ये प्रति क्विंटल २००० रु प्रमाणे एक हेक्टरला २५ क्विंटल कापूस हे प्रमाण धरुन शेतकर्‍यांच्या सातबार्‍याप्रमाणे कापूस खरेदी लागू करण्यात यावी. ज्यांचा कापूस घरात पडून आहे अश्या शेतकर्‍यांच्या याद्या प्रशासनाकडे तयार आहेत.
मागील वर्षी अतिवृष्टी व आता कोरोना लॉगडाउनमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. या शेतकर्‍यांना वाचवण्याकरीता तातडीने भावांतर योजना लागू करण्यात यावी. त्याच्याकरिता कापसाची खरेदी होत नसलेल्या नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकरीता रु. २००० क्विंटल प्रमाणे प्रति हेक्टर २५ क्विंटला भावांतर योजना लागू करण्यात यावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Protected Content