नैसर्गिक व्यायामाने बुध्दीस चालना मिळते – डॉ. प्रविण भोकरे

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा भावी पिढीला कळावी व त्यांना किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची गोडी लागावी या हेतूने किल्ले बनविणे अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज असून, यामुळे मुलांचा नैसर्गिक व्यायाम होऊन बुध्दीस चालना मिळते, असे प्रतिपादन चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रविण भोकरे यांनी केले. ते जेसीआय चाळीसगाव सिटी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गड किल्ले बनविण्याचे प्रात्यक्षिक शिबीरात बोलत होते. शहरातील भडगाव रोडवरील सुवर्णाताई देशमुख उद्यानात हा उपक्रम संपन्न झाला.

यावेळी डॉ. प्रविण भोकरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, जॉगिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिपक देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिलीप घोरपडे व डॉ. प्रसन्न अहिरे यांनी यावेळी मनोगत केले. धर्मराज खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पाडले. या शिबीरास कलाशिक्षक योगेश पवार, सादिक शेख, मनोज पाटील, अमोल रोजेकर, चेतन धनगर, रुपाली चौधरी, स्वाती देशमुख, तेजल नानकर यांनी विद्यार्थ्यांना गडकिल्ले बनिवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी चित्रकार योगेश पवार यांचेसह सर्व कलाशिक्षकांनी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती कशा प्रकारे बनविल्या जातात, यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात व त्यांचा वापर कसा केला जातो याविषयी विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा देखावा बनवितांना मार्गदर्शन केले. गडकिल्ले देखावा बनवितांना दिलीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांविषयी माहिती सांगितली. शिबीरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे, मनोज पाटील, महेंद्र कुमावत, जगन्नाथ चिंचोले, चंद्रकांत ठाकरे, आतिश कदम, सर्व जेसीआय माजी अध्यक्ष, सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाश धुमाळ यांनी केले तर आभार सचिव मयूर अमृतकार यांनी मानले.

समर्पण मासिकाचे प्रकाशन
यावेळी जेसीआयचे गृहपत्रक समर्पण या मासिकाचे प्रकाशन उपस्थित प्रमुख अतिथी यांच्यासोबत संजय पवार, बालाप्रसाद राणा, मुराद पटेल, राजेंद्र छाजेड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मासिकात संस्थेच्या विविध कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. या मासिकाचे अध्यक्ष धर्मराज खैरनार, सचिव मयूर अमृतकर, आयपीपी डॉक्टर प्रसन्न अहिरे, संपादक आकाश धुमाळ यांनी कामकाज पाहिले.

Protected Content