निसर्गात रममाण होणाऱ्या आजीबाईंचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । आज जागतिक पर्यावरण दिन. या पर्यावरण दिनाला सर्व निसर्ग हा हिरवागार आणि प्रसन्न असावा अशीच प्रत्येकाची कामना असते.  शहरातील एम. जे. कॉलेज मागील लक्ष्मी नगर भागात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा ध्रुवराज वारके या ७७ वर्षीय आजीबाईंना देखील असाच निसर्गात रमण्याचा एक वेडा छंद जडला आहे.  लहानपणापासून शेताची ओढ, शेतामध्ये काम करणे, शेतीशी जुळलेली नाळ,  कुटुंब शेतीमध्ये अशी पार्श्वभूमी असलेल्या या आजीबाई मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेले आहेत. 

प्रतिभा आजी राहत असलेल्या वैशाली अपार्टमेंट येथे त्यांनी चहुबाजूने वृक्षवल्ली निर्माण करून चैतन्याच्या वातावरणसह निरोगी वातावरण तयार करण्याचा एक छानसा प्रयत्न केलेला आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेली त्यांची मेहनत जर पाहिली  तर आपल्याला त्यामध्ये एक वेगळी विविधताही दिसून येते.  यासर्व झाडांमध्ये शोभेची, फळांची, विविध फुलांची यासह काही आयुर्वेदिक फायदे असणारी झाडे देखील त्यांनी लावली आहे. प्रत्येक झाडाचे नाव त्याचे फायदे त्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत असतात.  यामुळे एक प्रकारे पर्यावरण शिक्षण देण्यासाठी त्या प्रयत्न करीत असतात. कोरोनासारख्या महामारीने गेली सव्वा वर्ष मोठ्या प्रमाणात थैमान घातले. मात्र या पूर्ण काळामध्ये प्रतिभा आजींना एकदाही कोरोनाची लागण झाली नाही. तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देखील घेतले आहेत. त्यामुळे आरोग्यमय जीवन जगत असताना त्यांना निसर्गाची खूप साथ लाभली असं त्या आवर्जून सांगतात.  जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आजकाल झाडे तोडण्याचा प्रकार जास्त व झाडे लावण्याची वृती कमी दिसून येते.  तरुण मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जेष्ठ नागरिकांनी देखील घरी बसून हा एक उपक्रम केला पाहिजे. दिवसातून थोडासा वेळ दिला तरी देखील पर्यावरण व निसर्ग चांगला ठेवण्यासाठी मदत करू शकतात. लहान मुलांना देखील ते प्रेरणा देऊ शकतात. ऑनलाइन शाळांमुळे येणारा तणाव नाहीसा करण्यास मदत होते, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच वृद्धिंगत होईल,  असं प्रतिभा वारके यांनी सांगितले. यामध्ये आपण भाजीपाला देखील लाऊ शकतो. तसेच या छंदामुळे आपल्याला मानसिक ताण कमी करण्यासाठी देखील खूप चांगल्या प्रकारे मदत होते, असेही त्यांनी फायदे सांगताना म्हटले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/311910593751164

 

Protected Content