निर्भया : दोषींना उद्या फाशी देण्यासंदर्भात आज फैसला

nirbhay

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती तिहार कारागृहाच्या प्रशासनाने दिल्ली न्यायालयाला दिली आहे. तिहार कारागृह प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पातियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर सुनावणी घेण्यात आली.

इरफान यांनी न्यायालयाला सांगितले की, निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एका दोषीची दया याचिका प्रलंबित असून, अन्य तीन जणांना फाशी दिली जाऊ शकते. दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यात कोणतीही बाब बेकायदा नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले. याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांच्या वकील वृंदा ग्रोवर न्यायालयात उपस्थित राहिल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. यावरून वकिलांमध्ये वाद झाला. निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याने या याचिकेत केला आहे. न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका फेटाळून लावली होती.

दरम्यान, निर्भयाच्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी झाले असून, त्यांना १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. या चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. तसे डेथ वॉरंटही बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोषींपैकी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज दाखल केला. तो राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर अन्य आरोपी पवन कुमार याने घटना घडली, त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका केली. अखेर सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता दोषींना फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले.

Protected Content