*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज – प्रतिनिधी |* जिल्हयात बहुतांश ठिकाणी संसर्ग नियम शिथिल झाले आहेत. परंतु शासन, प्रशासन वा रेल्वे विभागाकडून जनरल प्रवास तिकिटे वा मासिक पासेस सुविधा अजूनही सुरु करण्यात आलेल्या नसल्यामुळे नियमित प्रवाशांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या सुविधांसह रेल्वेगाड्या नियमित वेळी सोडण्याची मागणी नियमित पासधारक प्रवाशाकडून केली जात आहे.
मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावर संसर्ग प्रादुर्भाव काळात विशेष गाड्यांसह प्रवासासाठी अनेक निर्बंध होते. परंतु सद्यस्थितीत संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक प्रवासी गाड्यांमध्ये सर्वसाधारण वा मासिक पास सुविधा सुरु करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर केंद्र वा राज्य रेल्वे बोर्डाकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सर्वसाधारण प्रवास तिकिटे, मासिक पासेस सुरु करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. परंतु भुसावळ विभागात विशेषता भुसावळ ते मनमाड दरम्यान सकाळी कार्यालयीन वेळेत जळगाव भुसावळ येथे येण्यासाठी एकही पॅसेंजर वा एक्सप्रेस नाही.
जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हाधिकारी, कोर्ट, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय कर्मचारी, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. परंतु एकीकडे गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसेसचा संप सुरु असून तो मिटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही, तर दुसरीकडे भुसावळ विभागात विशेषता भुसावळ ते मनमाड दरम्यान सकाळी कार्यालयीन वेळेत जळगाव भुसावळ येथे येण्यासाठी किंवा सायंकाळी ६ वाजेनंतर एकही पॅसेंजर वा एक्सप्रेस नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना खाजगी वाहनाद्वारे जीव धोक्यात घालून खर्चिक प्रवास करावा लागत आहे. प्रसंगी अनेकांना जीव देखील गमवावा लागला असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनरल तिकिटे, मासिक, त्रैमासिक पासेस सुविधा आणि मेल, एक्सप्रेससह पसेंजर गाड्या त्यांच्या पूर्वीच्या वेळेनुसार पूर्ववत सुरु करण्यात याव्यात अशी मागणी नियमित प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.