यावल बस स्थानकाची दुर्दशा; नूतनीकरणाची मागणी

WhatsApp Image 2019 03 09 at 6.38.44 PM

यावल (प्रतिनिधी) शहरातील ५o शी पार केलेल्या बसस्थानकाची सध्या दयानिय अवस्था झाली आहे. येथील एस.टी. आगार उत्पन्नात आघाडीवर मात्र प्रवासी सोयी सुविधांसाठी पिछाडीवर असल्याची भावना व नाराजी प्रवासी बांधवांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांवर पोहचली आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री व्यास महाराजांचे भव्य असे मंदीर, सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेले श्री मनुदेवीचे जागृत मंदीर, अट्रावल येथील श्री मुंजोबा मंदीर, याशिवाय आदीवासी समाज बांधवांचा उरुस असो की होळीचे भोंगऱ्या बाजार यात्रा असो, अशा विविध सणांसाठी वर्षभर हजारो प्रवासी येथील स्थानकावरुन ये-जा करीत असतात. प्रवासी बांधवांकडुन मिळणाऱ्या प्रचंड अशा प्रतिसादा मुळे आगारचे वार्षीक उत्पन्न हे पंचवीस कोटीच्या घरात पोहचले आहे. प्रवासी चांगला प्रतिसाद देत असतांना दुसरीकडे मात्र पन्नास वर्ष जुन्या बसस्थानकाची अवस्था फारच वाईट झालेली आहे. मोडकळीस आलेली बसस्थानकाची इमारत, अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असून बंद पडलेले उपहारगृह, पिण्याचे स्वच्छ पाण्याचा अभाव, बसस्थानक परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा, अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे बस स्थानक अडकले आहे. जिल्ह्यातील जवळपास सगळ्या बस स्थानकांचे नुतनीकरण झाले आहे. एवढेच नव्हे तर यावल तालुक्यात असलेल्या फैजपुर बसस्थानकाचेही नुतनीकरण झाले आहे. यावल च्या बस स्थानकासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक निधी मंजुर झालेला असुनही दोन वर्षांपासुन कुणीही या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही, हे येथील प्रवाशांचे दुर्दैव आहे. आता तरी शासन व प्रशासनाने लक्ष घालून या बस स्थानकाचे तात्काळ नुतनीकरण करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Add Comment

Protected Content