चितोडा येथे शाळेत रासेयोच्या विद्यार्थ्यांचे वैचारिक प्रबोधन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांचे तालुक्यातील चितोडा येथे कोवीड लसीकरण आणि वैचारिक प्रबोधनचे कार्यक्रम हिवाळी श्रम संस्कार शिबीराच्या माध्यमातून घेण्यात आले. अभियानाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश जाधव व प्रा. सुभाष कामडी यांच्यासह ४८ विद्यार्थ्यांनी व १८ ग्रामस्थ मिळून ६६ जणांनी कोविड लसीकरण बूस्टर डोसाचा लाभ घेतला. यासाठी भालोद ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर डॉ. प्राजक्ता चव्हाण, चितोडा प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या सहाय्यक डॉ. अर्चना पाचपोळ, यावल येथील एनजीओ यु.आर. जी. केअरचे श्री धीरज भोळे यांनी प्रथम विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण जाणीव जागृती याबद्दल समुपदेशीय मार्गदर्शन केले. यासाठी आरोग्य सहाय्यक नितीन जगताप, आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे, आरोग्य सेविका वैशाली महाजन, आशा सेविका तनुजा पाटील, कल्पना धांडे व मदतनीस सिंधुताई तायडे यांनी लसीकरण करून घेण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. दुपारच्या बौद्धिक सत्रात “युवकांचा ध्यास व ग्राम-शहर विकास” या विषयावर डॉ. नरेंद्र दिनकर महाले यांची कार्यशाळा संपन्न झाली.

याप्रसंगी डॉ नरेंद्र महाले यांनी आपल्या कार्यशाळेत ग्राम व शहर या संदर्भात युवकांची भूमिका ही प्रकर्षाने मांडली .युवक म्हणजे काय? युवक कसा असावा? युवकाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न करावेत ?त्यातून समाजाचा विकास कसा साधावा ,या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अनेक उदाहरणांच्या दाखला देत विद्यार्थ्यांना नवनवीन समाज विकसनाच्या योजना व उपक्रम यांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना स्व विकास साधून समाजविकासातून ग्रामीण भागाचा व सामाजिक विकास कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन केले डॉ महाले यांनी या कार्यक्रमात काही खेळ घेऊन त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.फार अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने कार्यशाळा संपन्न झाली. ग्रामीण व शहरी विकास करायचा असेल तर कृती व संस्कृती यांच्या समन्वयातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास होईल असे डॉ नरेंद्र महाले यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.डी. पवार, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ.एच.जी. भंगाळे, प्रा. भारती सोनवणे, प्रा सुभाष कामडी,प्रा गणेश जाधव, ह भ प संचित कोळी महाराज, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजस्विनी कोलते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी माळी हिने,तर आभार दिपाली पाटील हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दशरथ पाटील, दिगंबर बारी, हर्षल सोनवणे केशव काटकर, हृतिक बाउस्कर आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content