शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । वारंवार सूचना देऊनही फिजीकल डिस्टन्सींगचे पालन न केल्यामुळे येथील नगरपंचायतीने दोन भाजी विक्रेत्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे वारंवार मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. त्याच सोबत जमावबंदी आदेश भादवि कलम १४४ प्रमाणे लागू आहे. असे असतांनाही येथील पहुर दरवाजा परिसरामध्ये फिजिकल डिस्टन्सींगचे पालन न करता भाजी विक्रीच्या गाडीजवळ गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी भाजी विक्रेत्यांना नगरपंचायत कडून ध्वनिक्षेपक द्वारे व लेखी सूचनाही दिल्या आहेत. तरीही भाजी विक्रेते फिजीकल डिस्टन्स पाळत नाहीत. म्हणून दोन भाजी विक्रेत्यांवर भादवि कलम १४४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे येथील नगरपंचायत द्वारे पहूर पोलिस स्टेशन मध्ये भादवि कलम १४४ प्रमाणे नगर पंचायत कर्मचारी यांच्या विकास सपकाळ यांच्या फिर्यादीवरून भाजी विक्रेता मुन्ना बागवान (वय २८) आणि आकाश भोई (वय २३) ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे करीत आहेत. यामुळे आतातरी भाजी विक्रेते खबरदारी घेऊन मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी रोखतील का हे पाहणे गरजेचे आहे.