नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नियंत्रण रेषेजवळ संघर्ष असलेल्या भागात शांतपणे आणि टप्याटप्याने सैनिकांची संख्या चीनने पुन्हा वाढवली आहे. चार महिन्यापूर्वी चीननेच स्वत: संघर्ष असलेल्या भागांमध्ये दोन्ही बाजूंनी सैनिक संख्या वाढवणं टाळलं पाहिजे, असं म्हटलं होतं.
बोलायचं एक आणि करायचं दुसरं ही चीनची नियत आहे. पुन्हा एकदा चीनने त्याची प्रचिती दिली आहे. पूर्व लडाखमधील भागात अतिक्रमण केल्यापासून चीनने अनेक वेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळेच गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष घडला. ज्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले.
पूर्व लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मध्यंतरी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने काही उपाय सुचवले होते. पण आता स्वत: चीननेच त्याचे उल्लंघन केले आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने आपली स्थिती भक्कम केली आहे.
प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनने जे म्हटलं होतं, बिलकुल त्याच्या उलट केल्याचं स्पष्ट झालं आहे. २१ सप्टेंबरला सहाव्या फेरीच्या चर्चेनंतर भारत-चीनने संयुक्त पत्रक प्रसिद्ध केलं होतं. सहाव्या फेरीच्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये जे ठरलं होतं, त्यानुसार संवाद बळकट करणं, गैरसमज टाळणं, फॉरवर्ड भागात सैनिकांची नव्याने तैनाती थांबवणं, एकतर्फी निर्णय घेऊन जमिनीवरील परिस्थिती बदलायची नाही आणि परिस्थिती आणखी बिघडेल, अशी कुठलीही कृती करायची नाही असं ठरलं होतं. आज चार महिन्यानंतर आढावा घेतल्यास, तणाव कमी करण्यासाठी जे उपाय योजण्यात आले होते, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं दिसतं आहे.