निकृष्ट कामाचा कळस : रावेर नगर पालिकेची कोसळली नवी भिंत 

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील नगर पालिकेच्या इमारतीच्या जागेवर नव्याने इमारतीचे बांधकाम सूरू आहे. मात्र या इमारतीची मागील भागाची पूर्ण भिंत काल रात्री कोसळल्याने शहारत पालिकेतर्फे सूरू असलेल्या कामांच्या दर्जाचा प्रश्न चर्चेत आला आहे.

सुमारे दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपये खर्च करून येथील नगर पालिकेच्या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू आहे. मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच या इमारतीच्या मागील भागाची पूर्ण भिंत कोसळली आहे.

याबाबत निकृष्ट बांधकामाची तक्रार नागरिकांनी केल्यावरही मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांनी दखल घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

जुन्या इमारतींच्या जागेवर चावडी जवळ बांधकाम होणाऱ्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाबाबत शेख गयासुद्दिन काझी यांनी ३१ जानेवारी २०२२, १६ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीला मुख्याधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली होती. तसेच इमारतीच्या बांधकामासाठी अनधिकृतपणे ठेकेदाराने विजेचा वापर केला असल्याचा तक्रारीत उल्लेख केला होता.

दरम्यान रविवारी मध्यरात्री या इमारतीची इमारत पूर्ण होण्यापूर्वीच भिंत कोसळली आहे. इमारतीच्या बांधकामाची उच्च स्तरीय समिती नियुक्त करून चौकशी करावी अशी मागणी शेख गयासुद्दीन काझी यांनी केली आहे. संबधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

निकृष्ट बांधकाम होत असल्याबद्दल काझी यांनी याच संदर्भात १ जुलैला वकिलामार्फत मुख्याधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा कॉल बंद येत होता.

Protected Content