जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या ६ जानेवारी रोजीच्या आदेशान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नाशिक पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. या निवडणूकीसाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या वेळी विविध राजकीय पक्षांना/ उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळया प्रकाराच्या परवानग्या/परवाने तालुकास्तरावर तात्काळ प्राप्त करुन घेणेसाठी संबंधित तहसिल कार्यालयात एका खिडकी/सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिर सभांसाठी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी हे परवानगी देतील. परवानगीसाठी अर्ज, जागा मालकांचे संमतीपत्र, ग्रा.पं./नपा/ मनपाचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. पोस्टर्स/झेंडे सभेच्या ठिकाणी लावणेसाठी मुख्याधिकारी नगरपरिषद/ग्रामसेवक हे परवानगी देतील. यासाठी अर्ज, जागा मालकांचे संमतीपत्र, ग्रा.पं./नपा/मनपाचा नाहरकत दाखला जोडणे आवश्यक आहे. खाजगी जागेवर जाहिरात फलक लावण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद/ ग्रामसेवक हे परवानगी देतील. परवानगीसाठी अर्ज व जागा मालकांचे संमतीपत्र आवश्यक राहील.
प्रचार वाहनासाठी संबंधित तहसिलदार/मुख्याधिकारी हे परवानगी देतील. परवानगीसाठी अर्ज, वाहन नोंदणीपत्र, वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनाचे वैध वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालकाचा वैध परवाना आदि कागदपत्रे आवश्यक राहील. प्रचार कार्यालयाची परवानगी देण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी, परवानगीसाठी देतील. यासाठी अर्ज, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रा.प./नपा/मनपाचा नाहरकत दाखला सोबत जोडणे आवश्यक राहील. ध्वनीक्षेपकाची परवानगी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी देतील. यासाठी अर्ज, वाहनचालकाचा वैध परवाना आवश्यक असेल. मिरवणुक/रोड शो/रॅलीसाठी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी हे परवानगी देतील. यासाठी अर्ज (मिरवणुक/रोड शो/ रॅली ठिकाणी नमुद केलेला) आवश्यक राहील. उमेदवाराचे निवडणुक बुथसाठी (मतदानाचे दिवशी), मुख्याधिकारी/ तहसिलदार हे परवानगी देतील. यासाठी अर्ज, स्थानिक स्वराज्य संस्था नाहरकत दाखला, प्रभारी पोलीस अधिकारी नाहरकत दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. साठी तालुकास्तरावर नागरी भागासाठी मुख्याधिकारी व ग्रामीण भागाकरीता तहसिलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवार/त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सक्षम अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या तात्काळ देण्यात येतील.
नगरपरीषद/नगरपंचायत/ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र त्याचठिकाणी उपलब्ध होण्याकरीता संबंधीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती आणि मुख्याधिकारी नपा यांनी त्यांचे कार्यालयातील एक जबाबदार अधिकारी नेमून नाहरकत प्रमाणपत्र उमेदवार/त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांना तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत. असेही जिल्हाधिकारी यांनी त्यांचे आदेशात म्हटले आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन दिलेल्या परवानगीबाबत दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय (करमणूक शाखा) जळगाव यांचेकडे ईमेलवर सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. मित्तल यांनी दिले आहे.