नानार प्रकल्प ; शरद पवारांकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन

 

 

 

मुंबई:  वृत्तसंस्था । शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली चर्चेदरम्यान शरद पवार यांनी  नाणार प्रकल्पाबद्दल आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना दिली.

 

मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

तत्पूर्वी नाणार प्रकल्प समर्थकांनी सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आमचे हे एक काम तेवढे मार्गी लावा. आम्ही तुमचे काय ऋणी राहू, अशी भावना व्यक्त केली.

 

शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Protected Content