नाथाभाऊ समर्थकांची तयारी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह धूळ आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकनाथराव खडसे समर्थकांनी आपल्या नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची तयारी सुरु केली आहे. ताशा आशयाचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स ठिकठिकाणी आज लागलेले दिसले.

भाजपचा बहुजनवादी चेहरा आणि उत्तर महाराष्ट्रातील वजनदार राजकीय प्रस्थ म्हणून राज्याला एकनाथराव खडसे यांची ओळख आहे. कित्येक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात होती. ते नेमके कोट्या पक्षाला जवळ करतात हे बराच काळ स्पष्ट झाले नव्हते त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती. आता ते राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत यावरून सुरुवातीला तर्कवितर्क मांडले जात होते. मात्र, ते राष्ट्रवादीतच जाणार असून गुरुवारी मुंबईत एका सोहळ्यात ते प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. खडसेंच्या कन्या व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे व इतर सहकारीही गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. निवडक आणि निष्ठावान समर्थकांना त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईला निघा असा निरोप दिल्यानंतर हा मुद्दा आज स्पष्ट झाला .

त्यानंतर आज जिल्हाभरात बराच काळ आपल्या नेत्याला मुस्कटदाबी सहन करावी लागलेली आहे अशा भावनेतून त्यांच्या समर्थकांमधील नाराजी जणू काही मोकळी होण्यासाठी रस्त्यावर आली आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आपल्या नेत्याच्या समर्थनासाठी पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावले. नाथाभाऊ, मंदाताई खडसे, रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या छायाचित्रांसह लागलेले हे पोस्टर्स प्रदीर्घ काळातील ठसठसणारी या नेत्याविषयीची तळमळ व्यक्त करीत होते .

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातून बाजूला पडत गेले. भूखंड घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. कालांतरानं क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांना सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही डावलण्यात आले. विधान परिषदेतही संधी नाकारली गेली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना स्थान देतानाही खडसेंचा विचार केला गेला नाही. ही शेवटची संधीही हुकल्यानं अखेर खडसेंनी पक्षातरांचा निर्णय घेतला.

आता उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. त्यामुळे अत्यंत संयमाने प्रतिस्पर्ध्यांच्या चाली आतापर्यंत सहन केलेले एकनाथराव खडसे यांचे पक्षांतर नजीकच्या भविष्यात भाजपाला जिल्ह्यात कितपत त्रासदायक ठरू शकते हे पाहणे राजकीय जाणकारांना महत्वाचे वाटते.

Protected Content