जळगाव प्रतिनिधी । या एरियाचा मी दादा आहे…असे म्हणत तिघांनी दोन जणांना बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नाथवाडा येथे घडली. याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नाथवाडा येथील कालभैरव मंदिराजवळ मुक्ताबाई एकनाथ जोशी या कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. मुलगा हिरामण एकनाथ जोशी हा रिक्षा चालवून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतो. २५ ऑक्टोंबर रोजी गल्लीतील जोगेश्वर दुर्गादेवी मित्र मंडळाजवळ मुक्ताबाई, त्यांचा मुलगा हिरामण तसेच परिसरातील गणेश सोनार, मधूकर सोनार, उषाबाई सोनार व काही महिला उभ्या होत्या. तेव्हा रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास विशाल दत्त सोनवणे, हा त्याचे मित्र साहिल अकबर तडवी, पिंट्या तडवी (सर्व रा. नाथवाडा) यांना घेवून मंडळाजवळ आला. नंतर हिरामण याची कॉलर धरून तु स्वत:ला या एरियाचा दादा समजतोस का?..,या एरियाचा मी दादा आहे, असे म्हणत त्याला मारहाण केली. नंतर साहिल व पिंट्या यानेही मारहाण केली.
मित्र हिरामण याला तिघे मारत असल्याचे दिसताच, गणेश सोनार हा त्यास वाचविण्यासाठी धावला. मात्र, त्यालाही तिघांनी मारहाण केली. नंतर विशाल याने गणेशच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर भांडण सोडविण्यासाठी मुक्ताबाई आल्या असता, त्यांच्या हाताला सुध्दा विशाल याने चावा घेतला व नंतर बंदूकीने गोळ्या झाडून मारूण टाकण्याची त्याने धमकी दिली. अखेर या प्रकरणी शुक्रवारी मुक्ताबाई जोशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणा-या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.