नाट्य परिषद अध्यक्षांचा संयम संपला ; आरोप करणारांना झापले

 

मुंबई : वृत्तसंस्था । अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आता संयम संपल्याचे सांगत  काल त्यांच्यावर आरोप करणारांना पत्रकार परिषदेत जाहीरपणे झापले .

 

‘कुटुंबातील वाद कुटुंबात मिटावा यासाठी आजवर संयमाची भूमिका घेतली होती, परंतु सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे परिषदेची होणारी बदनामी सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे हे आरोप किती बिनबुडाचे आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची वेळ आली आहे’, अशी भूमिका घेत अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आजवरच्या आरोपांना स्पष्टीकरणासह उत्तर दिले.  यशवंत नाटय़मंदिर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आरोपांचे खंडन करत पूर्वीच्या कारभारावरही ताशेरे ओढले.

 

कोरोनाकाळातल्या निधी वाटपावरून नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीवर सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी कालपरवापर्यंत सुरूच होत्या. या आरोपांवर परिषदेचे अध्यक्ष कधी उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मौन सोडले. या परिषदेलाही नियामक मंडळ सदस्यांनी घटनाबाह्य़ ठरवले होते, परंतु आरोप करणाऱ्या नियामक मंडळ सदस्यांनाच परिषदेच्या घटनेचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी मांडले.

 

‘कोरोनाकाळात वाटप केलेला निधी नियामक सदस्यांना विचारात घेऊन केला नाही याबाबत कांबळी यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, परंतु सदस्यांनी वाद मिटवला नाही. त्या आर्थिक व्यवहाराचे सर्व तपशील परिषदेकडे आहेत. मनात दुसराच हेतू ठेऊन आजवरची ही चिखलफेक करण्यात आली. याचे बोलविते धनी वेगळे आहेत,’ अशी बाजू कोषाध्यक्ष नाथा चितळे यांनी मांडली. नाटय़ परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत कांबळी यांनी २०१८ ते २०२१ पर्यंतच्या सर्व कार्याचा लेखाजोखा मांडला. पुराव्यासहित सर्व आरोपांचे खंडन केले. त्यावर खोटय़ा आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्या, असे मार्गदर्शन पवार यांनी केले. त्यानुसार ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले.

 

नियामक मंडळ सदस्यांनी आयोजित केलेली विशेष बैठक स्थगित करण्यात यावी. तसेच अन्य मागण्यांसाठी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शहर दिवाणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणीत प्रसाद कांबळी यांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. पुढे वेळेआभावी सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. उर्वरीत सुनावणी १७ फेब्रुवारीला सकाळी होणार आहे.

 

तीन वर्षांत एकही घोटाळा झालेला नाही. तसे असेल तर नियामक सदस्यांनी पुरावे देऊन ते सिद्ध करावे. केवळ घटनाबाह्य़ मार्गाने पायउतार होण्याची मागणी होत असेल तर ती गैर आहे, असे प्रास्ताविक नाटय़ परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी केले.

 

परिषदेने उद्दिष्टांना धरून काम करणे अपेक्षित आहे. अशा स्वरूपाचे काम तीन वर्षांत झालेले नाही किंबहुना त्या आधीही झालेले नाही, असा आक्षेप नियामक सदस्य योगेश सोमण यांनी परिषदेत  केला . यावर ‘ग्रंथालय उभारण्यासाठी आम्ही आग्रही आहोत, परंतु संकुलात पुरेशी जागा नाही. कमलाकर नाडकर्णी आणि ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे अशा दिग्गजांनी परिषदेला बरीच पुस्तके भेट दिली आहेत. ती लोकांसाठी खुली करायला आम्ही तयार आहोत. शिवाय मध्यवर्ती शाखेत जरी कार्यशाळा झाल्या नसल्या तरी राज्यभरात असलेल्या शाखांमध्ये ते काम सुरू आहे’, असे स्पष्टीकरण कांबळी यांनी दिले.

 

‘तीन वर्षांच्या कार्यकाळात मी एकही घटनाबाह्य़ काम केले नाही किंवा आर्थिक घोटाळा केला नाही. तसे केले असेल तर कुणीही सिद्ध करावे, मी स्वत:हून राजीनामा देईन,’ अशा शब्दात कांबळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मागच्या कारभारात काय झाले आणि काय नाही यावरही चौकशी बसवण्यात येईल. त्यामुळे लवकरच अनेक घोटाळे बाहेर पडतील, असेही कांबळी यांनी सांगितले

Protected Content