नागरोटातील अतिरेक्यांचा बोगदा बीएसएफने शोधला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बोगदा शोधून काढला आहे. पाकिस्तानातून जमिनीखालून येणारा हा बोगदा २०० मीटर लांब आणि आठ मीटर खोल आहे. याच बोगद्यातून नागरोटा चकमकीत ठार झालेले चारही दहशतवादी भारतात दाखल झाले.

इंजिनिअरींगचे तंत्र वापरुन हा बोगदा तयार करण्यात आला होता. भारतात घातपात घडवण्याच्या इराद्याने दाखल झालेले जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी १९ नोव्हेंबरला नागरोटामध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले. सीमेवर सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सीमा ओलांडून प्रचंड शस्त्रसाठयासह हे दहशतवादी भारतात कसे दाखल झाले ? त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

 

भारताच्या बाजूला या बोगद्याचा व्यास १२ ते १४ इंच आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून हा बोगदा १६० मीटर लांबीचा तर पाकिस्तानच्या बाजूला हा बोगदा ४० मीटर लांब असेल असा अंदाज आहे. नव्यानेच बनवण्यात आलेला हा बोगदा जैशच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी पहिल्यांदा वापरल्याची शक्यता आहे “व्यवस्थित इंजिनिअरींगचे तंत्र वापरुन हा बोगदा बांधण्यात आला होता. यामध्ये तिथल्या सरकारी यंत्रणेचा हात स्पष्टपणे दिसतो” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांजवळ तैवानमध्ये निर्मिती करण्यात आलेला एक जीपीएस उपकरण होते. त्याच्या मदतीने ते भारतीय सीमेत घुसले. भारतीय यंत्रणांनी त्या जीपीएसच्या मदतीने दहशतवाद्यांना ट्रॅक केलं. बोगदा पार केल्यानंतर दहशतवादी १२ किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. मरण्याआधी या दहशतवाद्यांनी जीपीएस उपकरणावरील डाटा नष्ट करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण सुरक्षा यंत्रणांनी तो डाटा रिकव्हर केला.

 

Protected Content