नशिराबाद येथील तीन बालकांचा बुडून मृत्यू; गावात शोककळा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद जवळ असणाऱ्या वाघूर धरणाच्या पाटाच्या पुलाच्या चारीतील वाहत्या पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन बालके बुडाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. नशिराबाद गावातील भवानी नगरात शोककळा पसरली असून तिन्ही बालकांचे मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आले आहे. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता.

अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजता नशिराबाद येथील भवानी नगरचे रहिवासी मोहित दिलीप नाथ (वय १२), आकाश विजय जाधव (वय १३), ओम सुनील महाजन (वय ११) हे तिघेही वाघूर धरणावर पोहायला गेले होते. दरम्यान, सुभाष वाणी यांच्या शेताजवळ पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी ग्रामस्थांसह पोलीसांनी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचे मृतदेह काढण्यात आले असून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिघांपैकी दोघे नातेवाईक
सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाशच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. वडील हातमजुरी करतात. आकाश हा मोहितच्या आत्याचा मुलगा आहे. तर मोहितची आई, व वडीलांचे कौटुंबिक वाद असून आई माहेरी नशिराबाद येथे वास्तव्यास आहेत. मोहित हा सुध्दा आईसोबत मामाकडेच राहत होता. तर ओम याची आई वारली आहे. वडील वागवत नसल्यानेही तो नशिराबाद येथे त्याच्या मामाकडे राहत होता. त्याच्या पश्‍चात एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

Protected Content