नवी दिल्ली: वृत्तसंस्था । गेल्या वर्षात कोरोनातून बरे झालेल्या जवळपास ३० टक्के लोकांच्या अँटीबॉडीज आता नष्ट झाल्या आहेत . त्यामुळे ते पुन्हा कोरोनाच्या तावडीत सापडत आहेत त्यातच नव्या स्ट्रेंनचा संसर्गाचा म्हणजे प्रसाराचा वेग गेल्या वर्षातील कोरोना विषाणूपेक्षा जास्त आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे .
देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 18 ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला 12 लाख 64 हजार 698 सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्यावर्षी सुरु झालेला कोरोनाच प्रकोप यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा भरभर वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे ही रुग्णसंख्या आत्ताच इतक्या वेगाने का वाढत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गेल्या काही काळात जगभरात अनेक ठिकाणी नव्या स्वरुपाचे कोरोना विषाणू आढळून आले आहेत. ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि न्यूयॉर्कमध्ये आढळलेले कोरोना व्हेरिएंट चिंतेचे कारण आहे. मार्च महिन्यापर्यंत भारतामध्येही कोरोनाचा ‘डबल म्यूटेंट’ आढळून आला. महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधील नागरिकांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. कोरोनाचे हे नवे विषाणू अधिक संसर्गजन्य असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.
जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केले. त्यानंतर नागरिक पुन्हा एकदा राजरोसपणे फिरु लागले होते. सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिक सॅनिटायझरचा वापर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पूर्णपणे विसरुन गेले. अशातच कोरोनाचे नवे विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर 60 वर्षांवरील नागरिक आणि आता 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. तरीही आतापर्यंत देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या 7 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी पाच टक्के लोकांनी आता कुठे लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे लस उपलब्ध होऊनही कोरोनाच्या प्रादुर्भावाला हवा तसा आळा घालता आला नाही.
तज्ज्ञांच्या मतानुसार यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या 20 ते 30 टक्के लोकांमधील अँटीबॉडीज आता नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा कोरोनाची बाधा व्हायचे प्रमाण वाढले आहे. आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांच्या मतानुसार, एप्रिलच्या मध्यात भारतातील कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला असेल.