नवीन पाईपलाईनवरुन नळ संयोजन जोडून घ्या– नगराध्‍यक्षा मनिषा चौधरी

 

चोपडा, प्रतिनिधी । शहरातील जुनी पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ३१ जानेवारी २०२१ रोजी खंडित करण्यात येणार असून नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पाईपलाईनवरून नळ संयोजन जोडून घ्यावे असे आवाहन नगराध्‍यक्षा मनिषा चौधरी यांनी केले.

शहरासाठी महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्‍यस्‍तर) योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर झालेली आहे. या योजनेअंतर्गत मालापूर धरणापासून ते जलशुध्‍दीकरण केंद्रापर्यंत १४ कि.मी.ची पाईपलाईनचे काम पूर्ण करुन योजनेचे पूर्णत्‍वानंतर येणारे पाणी गुढीपाडव्‍याच्‍या शुभमुर्हूतावर ६ एप्रिल २०१९ रोजी उपलब्‍ध झालेले आहे. तसेच शहरात बहूतांश भागात नवीन वितरण वाहीनीचे काम पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे धरणाचे पाणी आपले दारापर्यंत आले आहे. सदरचे पाणी नागरिकांच्‍या नळाद्वारे घरात आले तर ख-या अर्थाने पाणीपुरवठा योजना फलश्रुत होणार हे नागरिकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. नागरिकांनी शहरात टाकण्यात आलेल्‍या नविन पाणीपुरवठा वितरण वाहिनीवरुन विहीत नमुन्‍यात अर्ज विहीत शुल्‍कासह नगरपरिषदेत भरणा करून नळसंयोजन जोडणी करुन घ्‍यावी. विशेष बाब म्‍हणजे जुन्‍या नळसंयोजनधारकांना या शुल्‍कात सुमारे ५० % इतकी सवलत देण्यात येत आहे. तरी आपल्‍याकडील थकीत पाणीपट्टीसह विहीत शुल्‍क भरणा करुन नळजोडणी करुन घ्‍यावी. तसेच दि. ३१ जानेवारी २०२१ नंतर जुनी पाणीपुरवठा वितरण वाहिनी खंडीत करणेत येणार असुन फक्‍त नवीन वितरण वाहीनीवरुन पाणीपुरवठा सुरु राहील. त्‍यामुळे नळसंयोजना अभावी आपणांस पाण्‍यापासून वंचित रहावे लागू नये याकरीता लवकरात लवकर नवीन नळजोडणी करुन घ्‍यावी असे आवाहन नगराध्‍यक्षा मनिषा चौधरी यांनी केले आहे.

तर करावा लागेल अतिरिक्त खर्च 

नळ जोडणी अभावी ब-याच प्रभागातील रस्‍त्‍यांची मंजुर कामे देखिल प्रलंबित आहेत. ती कामे त्‍या परिसरातील बहुसंख्‍य नळ जोडणी पूर्ण झाल्यावर सुरु करता येऊ शकतील. तसेच एकदा रस्‍त्‍याचे काम पूर्ण झाल्यास ग्राहकास मागणीनुसार नळ जोडणी करुन देणे काहीसे अवघड ठरेल व अशा नळ संयोजनामुळे रस्‍ता अनावश्‍यकपणे खोदावा लागून रस्‍ता नादुरुस्‍त होईल. तसेच रस्‍ता खोदून नळसंयोजन द्यावे लागले तर रस्‍ते खोदाई नुकसान भरपाईचा अतिरिक्‍त खर्च नागरिकांना करावा लागेल. सबब रस्‍त्‍याची कामे पूर्ण होणे अगोदर नविन वितरण वाहिनीवरुन नळजोडणीकरुन घ्‍यावी. तरी नागरिकांनी जुनी जलवाहीनी बंद होण्‍याच्‍या आत लवकरात लवकर नगरपरिषद कर निर्धारण व संकलन विभागात फॉर्म व शुल्‍क भरणा करुन नवीन वितरण वाहिनीवरुन नळ जोडणी करुन घ्‍यावी असे आवाहन चोपडा नगरपरिषदच्या नगराध्‍यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्‍याधिकारी व सर्व सदस्‍यांकडून करण्यात आले आहे.

Protected Content