नवनियुक्त स्थायी सभापतींची पहिली ऑनलाईन सभा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी ।आज स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेची सुरुवात तांत्रिक अडचणीने झाली असता शिवसेनेचे जेष्ठ नेते नितीन लढ्ढा यांनी सभा दुपारी किंवा उद्या घेण्यात यावी अशी सूचना मांडली. यावर सभापती घुगे पाटील यांनी थोडा वेळ द्या, कामकाजाला सुरुवात करूया असे आवाहन सभासदांना केले.

नितीन लढढा यांनी स्थायी सभा उद्या घ्या अशी सूचना मांडत असतांना भाजपाचे नगसेवक ललित कोल्हे यांनी आवाज येत नसल्याची तक्रार केली तर. नितीन लढ्ढा यांनी नाशिक पालिकेने ऑफ लाईन सभा घेऊन त्यानंत शासनास कळविले होते अशी माहिती देत सभा दुपारी किंवा उद्या घ्या अशी सूचना मांडली. सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी थोडा वेळ द्या कामकाजाला सुरुवात करु असे म्हणत सभेस प्रारंभ केला.

मागील काही महिन्यांपासून महापालिकेचे जेसीबी, कॉम्प्रक्टर टायर बदलवून घेण्यासाठी बंद असल्याने त्याबाबत नितीन लढ्ढा यांनी गेल्या स्थायी सभेत प्रश्न विचारला होता. त्याला आज देखील समाधानकारक उत्तर न मिळाल्याने इतके दिवस प्रशासन करते काय ? आयुक्तांचे प्रशासनावर वचक नाही का ? असा प्रश्न श्री. लढ्ढा यांनी उपस्थित केला. याला उत्तर देतांना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी वाहन विभागातील त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असल्याची माहिती सभागृहाला देऊन दिरंगाई करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कुलकर्णी यांनी दिली.

आकाशवाणी चौकात काही दिवसांपूर्वी एका चारचाकी गाडीने पेट घेतला होता. महाबळ अग्निशमन स्टेशनवर अग्निशमन बंब नसल्याने दीड तास उशिराने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचला, याकालावधीत ती गाडी पूर्ण जळून खाक झाली, जर महाबळ येथे अग्निशमन बंब असता तर इतके नुकसान झाले नसते असे मत नगरसेवक नितीन बरडे यांनी मांडले. महाबळ फायर स्टेशनमध्ये दारू पिणाऱ्यांचीच गर्दी होत असते असे बरडे यांनी निदर्शनास आणून दिले. तर तेथे अधिकृत परमिट रूम द्या अशी खोचक टीका नितीन लढ्ढा यांनी केली.

कर सल्लागाराची मुदत मार्च २०२० संपली असतांना त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव उशिरा का आला ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. यात दोषी असणाऱ्यांवर दिरंगाईची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाईचे आदेश आयुक्त कुलकर्णी यांनी दिले.

महापालिका हद्दीतील मेलेले जनावरे उचलून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी असलेले दोघा कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती न करता त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी तसा ठराव करण्यात आला असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली. ज्योती चव्हाण यांनी पूर्ण शहरासाठी दोनच कर्मचारी असल्याने त्यांचावर ताण पडत असल्याने प्रभाग समिती निहाय कर्माचारी नेमावेत अशी सूचना मांडून या दोघा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ६ ऐवजी वाढीव करून ११ महिन्याची करण्यात यावी अशी मागणी केली. उज्वला बेंडाळे यांनी या कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मुदत २५ ऑगस्ट रोजी संपलेली असून त्यांचा प्रस्ताव उशिराने का आला असा प्रश्न उपस्थित करत सभेत अधिकारी केवळ आश्वसन देत असल्याने नाराजी व्यक्त केली. यावर आयुक्त कुलकर्णी यांनी आगामी सभेत यावर चर्चा करू असे आश्वासन दिले असता नितीन लढ्ढा यांनी आपण त्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकू किंवा नाही हे स्पष्ट करा असा आग्रह धरला असता आयुक्तांनी सविस्तर चर्चा करून धोरण निश्चीत करावे लागेल असे सांगितले.

शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरलेली अमृत योजनेतील २४ बाय ७ या निकषांवर सभागृहात चर्चा करण्यात येऊन मीटरचा समावेश नसेल तर हे कसे शक्य होईल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून २४ तास ७ दिवस शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या योजनेत आवश्यक असणारे वाटर मिटरचा डीपीआरमध्ये समावेश नसल्याचे उघड झाले आहे. यावर सभागृहात चर्चा सुरु असतांना आयुक्तांनी माहिती घेऊ असे सांगितले असता नितीन लढ्ढा यांनी याबाबत प्रशासन व पदाधिकारी यांना माहिती नाही ही एक शोकांतिका असल्याचा टोला लगावला.

महापौर भारती सोनवणे यांनी या वादाबाबत भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, अमृत योजनेतील वाॅटर मीटरबाबत मजिप्रा, संबधित एजन्सी, स्थायी सभापती, आयुक्त यांची दोन दिवसात बैठक बोलवून यावर तोडगा काढण्यात येईल.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2807299349489829/

 

Protected Content