धोका नसल्यानेच सोनियांकडून मनमोहनसिंगांची निवड

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मनमोहन सिंग यांच्यापासून कोणताही धोका नसल्याचं सोनिया गांधी यांना वाटत होतं आणि मनमोहन सिंग यांची निवड सोनिया गांधी यांनी खुप विचारपूर्वक केल्याचंही ओबामा यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची भारतात जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ओबामा यांच्या पुस्तकाचा काही भाग अमेरिकेतील वृत्तपत्रानं प्रसिद्ध केला होता. त्यात राहुल गांधी हे एक चिंताग्रस्त नेते असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ओबामा यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे प्रामाणिक असल्याचं म्हणत त्यांची स्तुती केली होती. आता सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांची निवड का केली याबद्दलही ओबामा यांनी पुस्तकात उल्लेख केल्याचं समोर आलं आहे.

“कोणत्या एका नाही तर अनेक राजकीय जाणकारांचं असं म्हणणं आहे ती त्यांनी (सोनिया गांधी ) मनमोहन सिंग यांची निवड अशा कारणास्तव केली की त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यासाठी ते कोणत्याही प्रकारचा धोका ठरणार नव्हते जे काँग्रेसचे प्रमुखही बनण्याच्या तयारीत होते,” असं ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीचादेखील उल्लेख केला आहे. यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले होते.

“सोनिया गांधी या बोलण्यापेक्षा अधिक ऐकण्यावर भर देत होत्या. धोरणात्मक बाबींवर वेगळे विचार असल्यास अधिक सतर्क राहून त्या आपले मतभेद सांगत असत. तसंच अनेकदा त्या चर्चा राहुल गांधी यांच्याकडे वळवत असतं,” असंही ओबामा यांनी नमूद केलं आहे.

“सोनिया गांधी या अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धी असलेल्या आहे. म्हणूनच त्या अधिक ताकदवान आहेत, हे आपल्याला समजलं होतं. राहुल गांधीहेदेखील आपल्या आईप्रमाणेच हुशार आणि उत्साह असलेले वाटत होते. त्यांनीदेखील राजकारणातील भविष्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

यादरम्यान ते मध्ये मध्ये थांबून माझ्या २००८ च्या कॅम्पेनवर चर्चा करत होते,” असंही त्यांनी नमूद केलं आहे. परंतु यात त्यांची भीती दिसून येत होती. ते एका विद्यार्थ्याप्रमाणे वाटत होते. ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं असून आपल्या शिक्षकाला आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्यात योग्यतेची कमतरता किंवा विषयाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी असलेली उत्कटता नव्हती असं जाणवल्याचंही ओबामा यांनी लिहिलं आहे.

ओबामा यांनी आपल्या पुस्तकात मुंबईवर झालेल्या २६.११ च्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. “२६.११ च्या दशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तावर हल्ला करण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झालं. “वाढत्या मुस्लिमविरोधी भावनांमुळे भारतातील मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाचा प्रभाव अधिक मजबूत झाला याची त्यांना भीती वाटत होती,” असंही ओबामांनी नमूद केलं आहे.

“भारताचं राजकारण आताही जात, धर्म यांच्याच अवतीभोवती फिरत आहे. मनमोहन सिंग यांची उन्नत्ती जे सांप्रदायिक विभाजनावर मात करत देशाची प्रगतीच्या ओळखीच्या रूपातही असल्याचं म्हटलं जातं, वास्तविक पाहता ते खरं नाही,” असंही त्यांनी पुस्तकात नमूद केलं आहे.

Protected Content