ऋषिकेश : वृत्तसंस्था । राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिलाय. . ‘नवा भारत नव्या पद्धतीनं विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशी धरतीवरही लढू, जिथे धोका दिसेल तिथे आम्ही प्रहार करू’ असं अजित डोवाल यांनी म्हटलंय.
अजित डोवाल हे ऋषिकेशच्या परमार्थ निकेतन आश्रमाला संबोधित करत होते. ‘भारतानं कधीही कुणावर अगोदर आक्रमण केलेलं नाही, परंतु, नव्या रणनीतीप्रमाणे सुरक्षा धोके कमी करण्यासाठी कदाचित आपल्याला पहिली कारवाई करायला हवी होती’ असंही त्यांनी म्हटलंय. ‘हे गरजेचं नाही की आम्ही तिथे लढू जिथे तुमची इच्छा आहे, भारत युद्धाला तिथे घेऊन जाईल जिथून धोक्याची सुरुवात होते’ असं म्हणत डोवाल यांनी ही ‘भारताची नवी विचारधारा’ असल्याचं म्हटलंय.
‘आम्ही कधीही स्वार्थासाठी युद्ध केलेलं नाही. आम्ही युद्ध तर करणार. आपल्या जमिनीवरही आणि बाहेरही करू परंतु, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर परमार्थासाठी करू…’ असं वक्तव्यही अजित डोवाल यांनी केलंय. डोवाल यांनी हा पाकिस्तान आणि चीनला दिलेला इशारा आहे, असं म्हटलं जातंय.
परंतु, अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डोवाल यांचं हे वक्तव्य सद्य स्थितीवर कोणत्याही देशाविरुद्ध नव्हतं तर ते ऐतिहासिक संदर्भात बोलत होते.