धावत्या रेल्वेसमोर आल्याने पाचोऱ्यातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या प्रवाशी रेल्वेसमोर आल्याने शहरातील एका ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:४५ वाजता घडली असुन घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील संभाजी नगर भागातील रहिवाशी प्रतिभा महेश पाटील (वय – ३८) ह्या २७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७२ / ३५-३७ दरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असतांनाच डाऊन रेल्वे लाईन वरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा (क्रं. १२८०९) ही प्रवासी एक्सप्रेस भरधाव वेगाने भुसावळच्या दिशेने जात असतांना प्रतिभा पाटील यांना अंदाज न आल्याने त्या रेल्वे समोर सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची माहिती एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी परधाडे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना वॉकी टॉकीद्वारे कळविल्या नंतर पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या सह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. व रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने प्रतिभा पाटील यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए‌एसआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहे. प्रतिभा पाटील यांच्या दुःखद निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Protected Content