जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली ते दापोरा दरम्यानच्या जनता राजा शाळेजवळ धावत्या रेल्वेतून पडून परप्रांतीय तरूणाचा जागीची मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. आधारकार्डवरुन तरुणाची ओळख पटली असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजी नगर परिसरात संतोष घनश्याम राजभर (वय-३५, रा. उत्तप्रदेश) हा तरुण वास्तव्यास होता. उत्तरप्रदेश येथे आपल्या मूळगावी जाण्यासाठी मुंबईहून बसला होता. दरम्यान, रेल्वेने प्रवास करत असतांना शिरसोली ते दापोरा दरम्यान अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१३/१२ ते १४ दरम्यान, जानता राजा शाळेजवळ रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिरसोली स्टेशनप्रबंधकांनी घटनेबाबत तात्काळ तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, संजय भालेराव, अनिल मोरे, अनिल फेगडे व उमेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयत तरुणाची झडती घेतली असता त्याच्याखिशात आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन त्या तरुणाची ओळख पटली. याप्रकरणी स्टेशनप्रबंधकाच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आधारकार्डवरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर तात्काळ तरुणाच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार त्याचे कुटुंबिय मुंबई येथून जळगावला येण्यासाठी निघाले आहे.