पवारांचा ‘नेम’ आणि खडसे-महाजनांचा ‘गेम’ : अमोल जावळे करणार राजकीय भूकंप ?

जळगाव-संदीप होले | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत तिकिटाची ऑफर केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट मिळण्याची शक्यता होती. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तसे संकेत दिल्याने त्यांनी पूर्ण तयारी देखील केली होती. तथापि, भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आणि लागोपाठ तिसर्‍यांदा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना संधी दिल्याने ते नाराज झाले होते. त्यांनी पहिल्यांदा आपण पक्षाचा निर्णय मान्य करत रक्षाताईंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. तथापि, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतांना ते भाजपला जय श्रीराम करत पवार गटाच्या वतीने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

अमोल हरीभाऊ जावळे यांच्या समोर सद्यस्थितीत दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. यात पहिल्या पर्यायात त्यांनी थेट शरद पवार गटाच्या वतीने तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा अपक्ष म्हणून त्यांनी मैदानात उतरावे असा दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे. या दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय स्वीकारून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. प्रस्तुत प्रतिनिधीने या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण पक्षाचेच काम करत असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविणे हेच आपले उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी देऊन राजकीय पुनर्वसन केल्यानंतर देखील आमदार एकनाथराव खडसे हे पक्षांतर करून भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत कधीपासूनच मिळालेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते भाजपमध्ये घरवापसी करू शकतात असे मानले जात आहे. यामुळे त्यांनी शरद पवार गटाला एका अर्थाने ऐन लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी पक्षाला वार्‍यावर सोडले आहे. तर दुसरीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन हे रावेरातून पाच लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांना कोणताही सुगावा लागू न देता शरद पवार यांनी थेट अमोल हरीभाऊ जावळे यांच्यासारखा उज्वल राजकीय वारसा, स्वच्छ प्रतिमा, उच्च शिक्षित अशा लेवा पाटीदार समुदायातील तरूण उमेदवाराला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने हा खडसे आणि महाजन या दोघांसाठी मोठा धक्का बसणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात अमोल हरीभाऊ जावळे हे आपला निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आधीच उन्मेष पाटील यांच्या रूपाने एक माजी खासदार तर करण पवारांच्या माध्यमातून खंदा शिलेदार भाजपने गमावला असल्याने याची थेट दिल्ली दरबारी दखल घेण्यात आली आहे. यातच आता जर थेट जिल्हाध्यक्षच पदाचा राजीनामा देऊन हातात तुतारी धरत असेल तर ती पक्षासाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. यामुळे ना. गिरीश महाजन यांनी आजच अमोल जावळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. तर, पुढे नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर, दुसरीकडे नाथाभाऊ खडसे हे भाजपमध्ये जर येतील तर त्यांना भाजपमधील अंतर्गत विरोध मोडून काढत रक्षाताई खडसे यांचे तिकिट वाचवत त्यांना विजयी करण्याचे आव्हान हे देखील त्यांच्या समोर राहणार आहे. आणि खडसे व महाजन या दोन्ही मान्यवरांना अडचणीत आणण्याचे काम शरद पवार यांनी केले असून यात अमोल जावळे हे खरोखरीस राजकीय भूकंप करणार का ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Protected Content