जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून तरूणाला मारहाण केली व धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी १ जुलै रोजी रात्री साडेबार वाजेच्या सुमारास तांबापुरा परिसरातील लक्ष्मीनगरात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरा परिसरातील लक्ष्मीनगरात वसीम शहा मासूम शहा हा तरुण वास्तव्यास असून एका वखारीत लाकुड कटींगचे काम करतो. शनिवारी १ जुलै रोजी सकाळच्या सुमारास वसीम हा त्याचा मावस भाऊ फैजल नाशीर शहा याच्यासोबत काम करत होता. यावेळी वखारच्या बाजूला राहणारा समीर जावेद शेख हा त्याठिकाणी आला. त्याने फैजल याला फोन मागितला. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्याने मोबाईल परत न दिल्याने वशीम याने समीरला मोबाईल परत देण्यास सांगितले. त्यामुळे समीर याने फैजल याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर फैजल हा त्याच्या आईसोबत पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाले. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास वशीम हा घरी झोपलेला असतांना, समीर हा त्याच्या घरी आला. त्याने तुम्ही माझी पोलिसात तक्रार का केली, म्हणत वसीमसोबत वाद घालू लागला. वादात समीर हा वसीमला शिवीगाळ करीत असतांना त्याच्या पाठीमागून कोणीतरी धारदार वस्तूने वशीमवर वार करीत तेथून पळून गेले. या वादात वसीम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मध्यरात्रीच्या सुमारास समीर जावेद शेख रा. तांबापुरा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.