चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकानातून २ जणांनी दुकानात घुसून कपाटातून १ लाख ४६ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अडावद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन लखीचंद दहाड यांचे अडावद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुकान आहे. किरकोळ धान्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान रविंद्र भरत कोळी (वय-२२) आणि घनश्याम नवल महाजन (वय-१९) दोन्ही राहणार अडावद ता. चोपडा यांनी दुकानात घुसून कपाटात ठेवलेले १ लाख ४६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार नितीन दहाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अडावद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र भरत कोळी आणि घनश्याम नवल महाजन या दोघांविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.