ट्रॅक्टर बनले यमदूत : चिमुकलीच्या मृत्यूने आमडद्यात हाहाकार !

भडगाव-धनराज पाटील | तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे ट्रॅक्टर वस्तीत शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमडदे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

या संदर्भातील प्राथमिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर हे आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या जोरदार धडकेमुळे एक बालिका ठार झाली असून तीन-चार घरे उध्वस्त झाली आहेत.

या दुर्घटनेत वैशाली बालू सोनवणे या ११ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला असून बानूबाई वाघ ( वय ४२) ही महिला आणि पिंकी सोनवणे ( वय ५) हे जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोषी ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे. दरम्यान, परिसरातील वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप आमडदेकरांनी केला आहे.

या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. अर्थात, वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर दामटल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे वाळू वाहतूक करणार्‍या बहुतांश वाहनांवरील क्रमांक हा पुसलेला असतो. याच प्रमाणे या ट्रॅक्टरच्या क्रमांकातील एक अक्षर खोडलेले असल्याने त्याचा नेमका क्रमांक कोणता याची ओळख पटविणे कठीण होत आहे. अर्थात, चॅसीस क्रमांकावरून मालकाचा पत्ता शोधता येणार आहे. यामुळे यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली असून तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोवर भडगाव पोलिसात नोंदणी करण्याचे काम सुरू होते. तर या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content