धरणगाव प्रतिनिधी । बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने एनआरसी एनपीआर बॉयकॉट व ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी तालुकास्तरीय रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून सकाळी ११ वाजेला रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅलीमध्ये एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम व सर्व बहुजन समाजबांधव सहभागी होते. देशातील मूलभूत समस्या बाजूला सारून देशात अराजकता पसरवणे तसेच जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा साळसूद डाव सरकार साधत असल्याची घणाघाती टीका यावेळी करण्यात आली. रॅलीत साधारण पाचशेच्या वर जनसमुदाय सहभागी होता. धरणगांव तहसील कार्यालयावर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.
रॅलीचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र (वाघ) माळी यांनी केले. याप्रसंगी मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहनजी शिंदे, धरणगाव न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे, छत्रपती क्रांती सेनेचे लक्ष्मण पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष अल्लाउद्दीन खाटीक, भारत मुक्ती मोर्चाचे निलेश पवार ह्या मान्यवरांनी उपस्थिती जनसमुदायास मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक अहमद पठाण, काँग्रेसचे रामचंद्र माळी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी, प्रकाश लोखंडे, गौतम दोडे, विनोद बीजबीरे, राहुल वाघ, राजू लोखंडे, जावेद खाटीक, माजी नगरसेवक राजू शेख (राजूभाई सिग्मा), पाताळ नगरीचे अहिलेकार नगर मोमीन, बाळू चौधरी, गोपाळ माळी, आकाश बिवाल, रवींद्र पाटील, अजय मोरे, मयूर भामरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी निवेदनाचा स्वीकार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ साहेब यांनी केला. निवेदनात असलेले सर्व मुद्दे तहसिल कार्यालयात वाचून दाखवण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.