धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना व्हायरस देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात आपत्कालीन कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा तथा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना डीझेल, पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू शहरातील दुध विक्रेत्यांना आज चक्क धरणगाव महसूल विभागाने दिलेल्या पासेस नाकारत पेट्रोल देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार धरणगावातील किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंपावर घडला. विशेष म्हणजे दुध विक्रेत्यांनी याच पासेस दाखवत दुसऱ्या पेट्रोल पंपावरून नंतर पेट्रोल भरले.
आपत्कालीन कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा तथा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना डीझेल, पेट्रोलसाठी विक्रेत्यांना पासेस देण्यात आल्या आहेत. परंतू धरणगावात शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंपावर आज विचित्र प्रकार घडला. शहरातील साधारण १३ दुध विक्रेत्यांनी धरणगाव महसूल कार्यालयात पेट्रोल मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानुसार या सर्वाना धरणगाव नायब तहसीलदार यांनी दररोज १०० रुपयाचे देण्याबाबत एक पास जारी केला होता. या पासवर सर्व १३ दुध विक्रेत्यांचे नाव होते. आज यातील काही दुग्ध विक्रेते पेट्रोल भरण्यासाठी किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंपावर गेले असता, तेथील लोकांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. नकाराचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.
यावेळी दुग्ध संघटनेचे प्रमुख धीरेंद्र पुरभे यांनी तत्काळ महसूल कर्मचारी गणेश पवार यांना फोन लावून आपली तक्रार सांगितली. श्री. पवार यांनी पेट्रोलपंप चालकाशी बोलून पेट्रोल देण्याच्या सूचना केल्या. परंतू तरी देखील पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल देण्यास नकार दिला. यानंतर सर्व दुग्ध विक्रेते शहरातीलच पवार पेट्रोल पंपावर गेले. तेथे पासची सर्व माहिती गोळा करत त्यांनी सर्व दुध विक्रेत्यांना प्रत्येकी शंभर रुपयाचे पेट्रोल दिले. त्यामुळे एका पेट्रोल पंपाने महसूलचे आदेश पळाले तर दुसऱ्याने चक्क धूळकावून लावल्यामुळे दुध विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंपाशी संबंधित नोबल पेट्रोलपंपावर कुणालाही पेट्रोल,डीझेल दिले जात असल्याचा एक व्हिडीओ आजच समोर आला होता. आता धरणगाव प्रांताधिकारी तसेच तहसीलदार या दोघं पेट्रोलपंपांवर काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, या संदर्भात पेट्रोलपंप संचालकाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आम्हा दुध विक्रेत्यांना धरणगाव नायब तहसीलदार यांनी विशेष पास दिली होती. यानुसार आम्हाला दुध वाटपासाठी प्रत्येकी शंभर रुपयाचे पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंप वाल्याने महसूलचे आदेश अत्यंत उर्मटपणे धुळकावून लावले. तर दुसरीकडे पवार पेट्रोल पंपवाल्यांनी याच आदेशाचे सन्मानाने पालन केले. सोमवारी याबाबत तहसीलदार साहेबांकडे तक्रार करणार आहे.
धीरेंद्र पुरभे – दुध विक्रेता संघटना प्रमुख