धक्कादायक… ‘ती’ बेपत्ता वृध्दा कोवीड रूग्णालयाच्या शौचालयात मृत आढळली !

जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधित ८२ वर्षीय वृध्द महिला बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीसात दिली होती. ही महिला कोविड रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सदरील वृध्दा भुसावळ येथील रहिवाशी असून कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना १ जून रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. २ जून रोजी त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर ३ जुन रोजी नातेवाईक तब्बेतीची चौकशीसाठी सातत्याने संपर्क साधत असतांना रूग्णालय प्रशासनाने रूग्ण उपस्थित नाही असे बेजबाबदारपणे उत्तर दिले. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. रूग्णालयाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. त्या वृध्देस शोधणे कठीण झाले होते.

दरम्यान आज ११ वाजेच्या सुमारास संबंधीत वृध्दा ही वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत आढळून आली. दरवाजाला आतून कडी लावली होती. शौचालयातून दुर्गंधी येवू लागल्याने कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडला व ती महिला गेल्या दोन तीन दिवसांपासून मृत झाली असावी असा अंदाज रूग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोवीड रूग्णालयाचा अत्यंत भोंगळ कारभार समोर आला आहे. बेफिकीरपणे रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. तेथील डॉक्टर, नर्स, पोलीस, सुरक्षा रक्षक करतात तरी काय असा संताप कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या अनेक नातेवाईकांनी केली आहे. एवढी गंभीर घटना घडते. प्रशासन ढिम्म झाली असून रूग्णालयाचे डिन, जिल्हाधिकारी यांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असून याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना संबंधित वृध्देचे नातेवाईक तक्रार देणार असल्याचे कळविले आहे.

Protected Content