आप्पांना तांत्रिक अडचण आल्यास विशाल देवकर यांना उमेदवारी देण्याची मागणी (व्हीडीओ)

WhatsApp Image 2019 09 05 at 5.08.25 PM 300x85 1

 

जळगाव (प्रतिनिधी) धुळे न्यायालयाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागण्यात आली आहे. परंतु तरी देखील भविष्यात तांत्रिक अडचण आल्यास देवकर आप्पांऐवजी त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनाच उमेदवारी द्यावी,अशी मागणी धरणगाव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी धरणगाव तालुका राष्ट्रवादीच्यावतीने केली. तर आप्पांच्या परिवारातील कुणीही उमेदवार नसेल तर आपण इच्छुक असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कार्यालयात इच्छुक उमेदवारांशी पक्षनेत्यांनी संवाद साधला.

 

या संदर्भात अधिक असे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यलयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रभारी करण खलाटे, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आ. डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रवींद्रभैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष महानगर नामदेवराव चौधरी आदी उपस्थित होते.

 

जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या बाबतीत इच्छुक उमेदवारांनी पक्षनेत्यांशी संवाद साधला. यावेळी सर्वप्रथम संजय पवार यांनी उमेदवारीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी देखील उमेदवारीबाबत इच्छुक असल्याचे सांगितले. तर,पवार गटातील सर्व ८ इच्छुकांनी आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी दिली, तरी चालेल असे सांगितल्याचे कळते. यानंतर माजी जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे मागील पाच वर्षापासून तयारी करताय. परंतु आता तांत्रिक अडचण आल्यामुळे देवकर अप्पा किंवा त्यांच्या परिवारातील कुणीही इच्छुक नसेल. तर आपण विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

 

यानंतर धरणगावचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी सांगितले की, धुळे न्यायालयाच्या निकालाविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी हायकोर्टात दाद मागितली आहे. निवडणूक लागण्याआधीच त्यावर निर्णय अपेक्षित आहे. परंतु तरी देखील भविष्यात तांत्रिक अडचण आल्यास देवकर आप्पा यांचा जनसंपर्क आणि विकासकामांमुळे विशाल देवकर यांनाच उमेदवारी दिल्यास पक्षाच्या हिताचे राहील. किंबहुना धरणगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची देखील देवकर आप्पा यांच्यानंतर विशाल देवकर यांच्याच नावाला पसंती असल्याचे सांगीतले.

 

Protected Content